Update:  Monday, April 21, 2014 3:32:12 AM IST


| |

तरुणाई
- डॉ. श्री बालाजी तांबे
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2013 - 01:00 AM ISTतारुण्य नुसते वयावरून ठरत नाही. तारुण्याचे गुण टिकवता आले तर तरुणाई कायम राहण्यासाठी निश्‍चितपणे प्रयत्न करता येतात. लवचिकता, स्निग्धता, नवीन गोष्टी स्वीकारण्याचा- नवीन वातावरणात सरमिसळून जाण्याचा स्वभाव हे सर्व तरुणाईचे गुण असतात. तारुण्य टिकवायचे असेल तर शरीराची, मनाची लवचिकता कायम राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी व्यायाम व प्राणायाम मोलाचा आहे.

बालपण, तारुण्य व म्हातारपण या वयाच्या तीन अवस्था होत. निसर्गक्रमानुसार एकातून दुसरी, दुसरीतून तिसरी अवस्था येणार हे सर्वज्ञात असले तरी तारुण्याची ओढ, तारुण्याचे आकर्षण व तारुण्य टिकवून ठेवण्याची इच्छासुद्धा साहजिकच म्हणायला हवी.

आयुर्वेदातही वयःस्थापन ही संकल्पना आहे.

वयः तारुण्यं स्थापयति इति वयःस्थापनम्‌ ।
...चरक सूत्रस्थान


तारुण्य टिकवून ठेवणे म्हणजे वयःस्थापन. अर्थात तारुण्य नुसते वयावरून ठरत नाही, तर तारुण्याचे गुण टिकवता आले तर वयःस्थापनासाठी अर्थात तरुणाई कायम राहण्यासाठी निश्‍चितपणे प्रयत्न करता येतात.

तारुण्य टिकवायचे म्हणजे शक्‍ती टिकवायची, कार्यक्षमता-उत्साह कुठेही कमी पडू द्यायचा नाही; सर्व शरीरावयव, सर्व इंद्रियांचे आरोग्य असे राखायचे, की त्यांच्यात काहीही वैगुण्य येणार नाही; कंटाळा, उदासीनता, अकारण चिंता यांना अजिबात थारा द्यायचा नाही. हे सर्व होण्यासाठी वयाचे बंधन असावे लागत नाही. शरीराची, तसेच मन, इंद्रियांची, बुद्धीची सुरवातीपासून नीट काळजी घेतली, आहार-आचरणामध्ये काय योग्य, काय अयोग्य याची जाणीव ठेवली, तर वाढत्या वयातही तरुणाई टिकून राहू शकते.

एखाद्या उपकरणामध्ये सेल टाकायचा असेल किंवा ते उपकरण विजेच्या प्रवाहाला जोडायची योजना असेल, तर कोणत्या प्रकारचे सेल टाकणे आवश्‍यक आहे, हे आपण पाहतो किंवा किती तीव्रतेचा वीजप्रवाह लागणार आहे याची खात्री करतो. कारण तरच ते उपकरण व्यवस्थित क्षमतेने काम करणार असते. अतिदाबाचा वीजप्रवाह मिळाला तर क्षणार्धात कायमचा बिघाड होऊ शकतो, हेसुद्धा आपण जाणतो. तसेच शरीराची क्षमता, शक्‍ती कमी होऊ नये अशी इच्छा असेल तर शरीराला साजेसे, प्रकृतीला अनुकूल अन्न सेवन करणे फार आवश्‍यक असते.

आहार असावा असा

वातप्रकृतीच्या व्यक्‍ती अति बारीक किंवा फार स्थूल असतात, त्वचा-केस-नखे वगैरे ठिकाणी कोरडेपणा अधिक असतो, स्वभावातही चंचलता, अस्वस्थपणा अधिक असतो. अशा व्यक्‍तींनी दूध, तूप लोणी, बदाम, पंचामृत, सुंठ-गूळ-तूप, साखर, योग्य प्रमाणात मसाल्याचे पदार्थ वगैरेंचा आहारात नियमितपणे समावेश करायला हवा. पित्त प्रकृतीच्या व्यक्‍ती बारीक, नाजूक चणीच्या, मध्यम बांध्याच्या असतात. त्वचा, केस, डोळे, नखे वगैरे ठिकाणी पिवळसर लालसर छटा असण्याची प्रवृत्ती असते, तहान-भूक सहन होत नाही, स्वभावात तापटपणा असतो; पण शौर्य, नेतृत्व हे गुण तसेच अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा भावही असतो. अशा व्यक्‍तींनी दूध, लोणी, साय-साखर, तूप, मनुका, लाह्या, शहाळे, अंजीर, आवळ्यापासून बनविलेला मोरावळा, गुलकंद वगैरे पित्त संतुलन करणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश करणे चांगले.

कफ प्रकृतीच्या व्यक्‍ती भरभक्कम बांध्याच्या, सशक्‍त शरीराच्या असतात. यांची त्वचा व डोळे सतेज असतात, स्वभाव शांत व सोशिक असतो. आवाज मधुर व ऐकत राहावा असा असतो. अशा व्यक्‍तींनी दूध, तूप तर खावेच, पण आले, सुंठ, ओवा, वेलची, दालचिनी वगैरे पदार्थांचा समावेश करावा. मध, गरम पाणी, आसव यांचाही अंतर्भाव असावा.

अन्नपदार्थ योग्य प्रमाणात सेवन करण्याबरोबरच ते कसदार आहेत, उत्तम प्रतीचे आहेत हेही पाहायला हवे. उदा. बदाम कुटला तर त्यातून तेल निघायला पाहिजे. लवंग बोटात धरून दाबल्यास आतला स्निग्धांश जाणवायला पाहिजे. केशराचा सुगंध दीर्घ काळ टिकायला हवा, दूध तापवले असता वर घट्ट साय यायला हवी वगैरे. अशी उदाहरणे अनेक सांगता येतील. मुळात प्रत्येक वस्तू वीर्यवान, सकस आहे ना याची खात्री करून घेतली तर तिच्या सेवनाने शक्‍ती टिकू शकते, पर्यायाने तारुण्य टिकू शकते.

धातूंची संपन्नता महत्त्वाची
तारुण्यावस्थेचे अजून एक लक्षण म्हणजे सर्व शरीरधातू संपन्न अवस्थेत असणे. हाडांमधून कटकट आवाज येणे, जराशा श्रमांनी कंबर-पाठ दुखणे, विस्मरण होणे, अकारण थकवा जाणवणे, ही सगळी लक्षणे अस्थी, मज्जा, शुक्र हे महत्त्वाचे धातू क्षीण होत असल्याची निदर्शक असतात. वय कमी असो किंवा अधिक, सर्व धातूंना पोषण मिळाले तरच तारुण्य टिकवून ठेवता येते. यासाठी आहार संपूर्ण, संतुलित, सर्व धातूंना ताकद देऊ शकणारा असावा लागतो. म्हणूनच, चौरस व परिपूर्ण आहाराचे महत्त्व सांगितले जाते.

लवचिकता, स्निग्धता, नवीन गोष्टी स्वीकारण्याचा, नवीन वातावरणात सरमिसळून जाण्याचा स्वभाव हे सर्व तरुणाईचे गुण असतात. झाडाच्या फांदीमध्ये जोवर जीवन आहे तोवर त्यातील चिवटपणा शाबूत असतो; जीवन संपले, प्राणशक्‍ती उडून गेली की फांदी कटकन तुटते किंवा एखादी वेल कोवळी असेपर्यंत झाडावर वा कमानीवर नीट चढवता येते, एकदा का वेल वेडीवाकडी वाढली की तिला आकार देणे अशक्‍य असते. तसेच तारुण्य टिकवायचे असेल तर शरीराची, मनाची लवचिकता कायम राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी व्यायाम व प्राणायाम मोलाचे असतात. सूर्यनमस्कार, इतर व्यायाम, योगासने, चालणे वगैरेंचा सराव केला तर शरीराची लवचिकता कायम राहते; तर मनाची संयमशक्‍ती, नवीन गोष्टींना स्वीकारण्याची शक्‍ती वाढवायची असेल तर मनावर काम करणारे दीर्घ श्‍वसन, ॐक़ार गुंजन, अनुलोम-विलोम, तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केलेला प्राणायाम-भस्त्रिका वगैरे उपयोगी पडतात.

रसवाहिनी दुष्यन्ति चिन्तानां चातिचिन्तनात्‌ ।
म्हणजे संपूर्ण शरीराचे पोषण करणारा, सर्व धातूंना जीवनरूपी रस पाजून टवटवीत ठेवणारा रसधातू, अतिचिंतेमुळे स्वतः सुकतो, असे या सूत्रात सांगितले आहे. यावरून चिंता, मानसिक ताण तारुण्यासाठी किती हानिकारक असतात हे लक्षात येईल. मानसिक ताण येऊ नये, आला तरी तो दूर करण्याची सक्षमता असावी यासाठी मन-बुद्धी, विवेकशक्‍ती, योग्य निर्णयशक्‍ती यांचा विकास व्हायला हवा. त्यासाठी योग, ध्यान, स्वास्थ्यसंगीत, ॐकार गुंजन यांच्यासाठी थोडा तरी वेळ काढणे, स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवणे, एखादा छंद जोपासणे, हे सर्व महत्त्वाचे होय.

शरीरशुद्धी आवश्‍यक

नियमित अभ्यंग, अर्थात आयुर्वेदिक पद्धतीने सिद्ध केलेले तेल रात्री किंवा सकाळी स्नानाच्या आधी दीड-दोन तास संपूर्ण अंगाला लावणे, कान, पाय व डोके ही स्थाने कायम स्निग्ध ठेवणे, उदा. कानात श्रुती तेलासारखे तेल टाकणे, पादाभ्यंग करणे, नाकात तूप टाकणे, टाळूला तेल लावणे, हेसुद्धा तारुण्य टिकविण्यासाठी महत्त्वाचे असतात.

तारुण्य टिकविण्यासाठी शास्त्रोक्‍त पद्धतीने शरीरशुद्धी करून घेणे व नंतर योग्य रसायनांचे नियमित सेवन करणे, हाही उत्कृष्ट उपाय होय. ज्याप्रमाणे एखादा आरसा धुळीने माखला असता समोरच्याचे प्रतिबिंब दाखविण्यास असमर्थ ठरतो, त्याप्रमाणेच शरीरात अशुद्धी, विषद्रव्ये साठू लागली की प्रत्येक पेशीची कार्यक्षमता कमी कमी होऊ लागते. याचेच पर्यवसान कुठल्यातरी रोगात होते. रोगाच्या बंधनात अडकायला झाले, की तारुण्य कोठून टिकणार? तेव्हा प्रकृती, जीवनशैली यांचा सारासार विचार करून योग्य पद्धतीने शरीरशुद्धी करून घेतली, तर प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव पुन्हा सक्षमतेने काम करू लागतो. अर्थात तारुण्य टिकून राहण्यास मदत मिळते.

च्यवनप्राश, धात्री रसायन, सॅनरोझ, आत्मप्राशसारखी रसायने शरीरशुद्धीनंतर सेवन करणे, हेसुद्धा अधिक प्रभावी असते.

जराव्याधिनाशकमौषधम्‌ रसायनम्‌ । स्वस्थस्य ओजस्करं यत्तु तद्‌ वृष्यं तद्‌ रसायनम्‌ ।...चरक विमानस्थान

म्हातारपण टाळणारे आणि व्याधींचा नाश करणारे औषध म्हणजे रसायन होय. निरोगी व्यक्‍तीच्या मनाची, तसेच तनाची तुष्टी, पुष्टी व उत्साह वाढविणारे ते रसायन होय.

रसायनांचे फायदे
आयुर्वेदात रसायनांचे फायदे या प्रकारे सांगितले आहेत,
दीर्घमायुः स्मृतिं मेधां आरोग्यं तरुणं वयः । प्रभावर्णस्वरौदार्य देहेन्द्रियबलं परम्‌ ।।
वाक्‌सिद्धिं प्रणतिं कान्तिं लक्षते ना रसायनात्‌ । लाभापायो हि शस्तानां रसादीनां रसायनम्‌ ।।
...चरक चिकित्सास्थान


रसायनाचे सेवन करण्याने मनुष्याला दीर्घायुष्य, उत्तम शरीरबल, श्रेष्ठ इंद्रियशक्‍ती, वाक्‍सिद्धी, नम्रता, प्रभा या सर्व गुणांचा लाभ होतो. रसायनांमुळे वाणीला सिद्धी प्राप्त होते, सतेज कांतीचाही लाभ होतो.

सध्याच्या प्रचलित भाषेत सांगायचे तर रसायनांच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम राहते, रोगातून पूर्णपणे बरे होण्यासाठी, तसेच पुन्हा पुन्हा रोग न व्हावा म्हणूनही रसायनांचा उपयोग होतो. रसायनांमुळे स्टॅमिना चांगला राहतो, काम करण्यास उत्साह येतो, नवीन कल्पना सुचण्यास मदत मिळते, शारीरिक व मानसिक ताण सहन करण्याची क्षमता उत्पन्न होते. अर्थातच तारुण्य टिकून राहण्यास मदत मिळते.

थोडक्‍यात, वयाच्या हिशोबात न पडता कायम तारुण्य राखणे, हे आपल्याच हातात आहे. सुरवातीपासून योग्य ते प्रयत्न केले, आहार-आचरणात संतुलन साधले, तर अक्षय तारुण्याचा अनुभव घेता येईल, यात शंका नाही.

 
0
 
0
 

फोटो गॅलरी
प्रतिक्रिया
salim shaikh dubai - शनिवार, 2 मार्च 2013 - 11:44 PM IST
its very useful, suggest some specific "rasayan" to eat for different age people. afterall its all by food what we eat is giving us the health good or bad. Also nowdays "fast food affecting the new/young genearation". some article should be on this topic will be very useful. Thanks
 
0
 
0
 

rahul pawaR - बुधवार, 13 फेब्रुवारी 2013 - 06:24 PM IST
AJKAL KHARACH TARUNANMADHE FARACH KAMTARTA DISTE TARUN PIDHI SEX MULE TE TYANCH VIRYACHA ATUPYOG KARUN VIRYA VAYA GHALWAT AHET TYAWAR TIPS DYAVYAT
 
0
 
0
 

Chandrashekhar - मंगळवार, 5 फेब्रुवारी 2013 - 11:36 AM IST
खूपच छान लेख ....
 
0
 
0
 

Shireen - रविवार, 3 फेब्रुवारी 2013 - 06:36 PM IST
फारच छान आणि माहितीपूर्ण लेख. रसायनांचे सेवन हे सर्वोत्कृष्ट. रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर काही विशिष्ट पद्धतीने आंबवलेल्या द्रवरूप रसायनांचे सेवन केल्यास प्रकृती उत्तम राहते असा माझा अनुभव आहे.
 
0
 
0
 

ashish k.chandel - शनिवार, 2 फेब्रुवारी 2013 - 06:49 PM IST
inspire and very helpful artical for us youth.....
 
0
 
0
 

vimal ramesh ahire - शनिवार, 2 फेब्रुवारी 2013 - 01:11 PM IST
very nice article
 
0
 
0
 

ram - शनिवार, 2 फेब्रुवारी 2013 - 10:05 AM IST
nice article
 
0
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक
संबंधित बातम्या
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2014 eSakal.com - All rights reserved.
of MyVishwa
ePaperGallery 
Powered By: