Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

कळणेत बेकायदेशीर खनिज उत्खनन
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, April 15, 2012 AT 12:45 AM (IST)
Tags: sawantwadi,   crime,   konkan
ओंकार तुळसुलकर-सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी- कळणे (ता.दोडामार्ग) येथील खनिज उत्खनन प्रकल्पाने 9 लाख 99 हजार 477 क्‍यूबीक मिटर एवढे बेकायदेशीर खनिज उत्खनन झाल्याचा अहवाल कोल्हापूर येथील भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाच्या उपसंचालकांनी दिला आहे. कंपनीने मात्र या अहवालास हरकत घेतली आहे.

दरम्यान, हा अहवाल आज ज्येष्ठ समाजवादी नेते तथा लोकशिक्षण समितीचे प्रा.गोपाळ दुखंडे यांनी जिल्हाधिकारी विरेंद्रसिंह यांना सादर केला व चौकशीची मागणी केली. कोल्हापूर येथील भूविज्ञान उपसंचालकांनी यासंदर्भात कार्यवाहीसाठी भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाच्या संचालकांना अहवाल दिला आहे. उद्योग, उर्जा व कामगार मंत्रालयाच्या प्रधान सचिवांनाही योग्य त्या कार्यवाहीसाठी अहवाल देण्यात आला आहे. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी यासंदर्भात लेखी तक्रार दिली होती.

अहवालातील नोंदीनुसार भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाच्या पथकाने डिसेंबर 2011 मध्ये 27 ते 29 तारखेदरम्यान कळणे खाणीची तपासणी केली. यावेळी कंपनीचे अधिकारी शेखर गावकर, मुख्य अधिकारी मनोज ठाकुर उपस्थित होते. भूवैज्ञानिक ए. पी. सराफ, जिल्हा खनिकर्म अधिकारी व्ही. जी. गुरव, डी. बी. मोरे, व्ही. एन. खरतोडे आदींचा या पथकात समावेश होता. पाहणीतील निष्कर्षाचा अहवाल शासनाला दिला आहे. या अहवालात नमूद केल्यानुसार कळणे येथील सर्व्हे नंबर 57 मधील 1 ते 4 मध्ये खनिज प्रकल्पाला परवानगी होती. मात्र या शिवाय सर्व्हे नंबर 57/5मध्येही उत्खनन झाल्याचे आढळून आले. खाण सिमांकन क्षेत्राबाहेर अतिक्रमण करून खाणकाम केल्याचे आढळून आले आहे. अंदाजे 9 लाख 99 हजार 477 क्‍यूबीक मीटर एवढे बेकायदेशीर उत्खनन झाल्याचे अहवालात म्हटले आहे. यासंबधीचा नकाशा अहवालासोबत जोडण्यात आला आहे. सिमांकन केलेल्या खनिजपट्टया बाहेर जाउन उत्खनन झाले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्याची अट घातली जाते, परंतु कळणे खनिज प्रकल्पाच्या ठिकाणी भाडेपट्टा करारात निश्‍चित केलेल्या क्षेत्राबाहेर वृक्षारोपण झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

दरम्यान विधीमंडळातही सिंधुदुर्गातील खनिज उत्खनन प्रकल्पासंदर्भातील प्रश्‍न उपस्थित झाला होता. त्यावेळी शासनाच्यावतीने चार एफ.आय.आर. दाखल झाल्याचे सांगण्यात आले होते. त्या एफ.आय.आर.नेमक्‍या कोणत्या आहेत, ते पहाणे गरजेचे आहे, असे पर्यावरणवादी कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी सांगितले.

पुन्हा पाहणीची मागणी
यासंदर्भात दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी कळणे खनिज प्रकल्पाचे शेखर गावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""यासंबधीचा अहवाल आला आहे; परंतु कंपनीने त्या अहवालाला हरकत घेतली आहे. संबधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली, त्यावेळी भूमी अभिलेखचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. याबाबत पुन्हा पाहणी करण्याची मागणी केली आहे.''
प्रतिक्रिया
On 15/04/2012 09:35 AM Laxman D. Gawas said:
खनिज प्रकल्प वाले लोकांची आणि शासनाची दिशाभूल करीत आहेत, लोकांनी आणि शासनाने गंभीर होणे आवश्यक आहे . लोकांनी जागरूक होऊन हे विनाशकारी प्रकल्प बंद करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या मध्ये लोक मरतील, सरकारचे काहीही नुकसान नाही .


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: