Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

135 दिवसांत 300 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
सुरेंद्र चापोरकर - सकाळ वृत्तसेवा
Saturday, May 19, 2012 AT 04:30 AM (IST)

अमरावती - शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत; तरीदेखील आत्महत्या थांबण्याचे नावच घेत नसल्याची गंभीर स्थिती आहे. चालू वर्षाच्या 135 दिवसांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा 300 च्या घरात गेल्याची धक्कादायक माहिती आहे.

विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात विदर्भाच्या 6 जिल्ह्यांत 82; तर मे महिन्यात आतापर्यंत 14 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. 2001 पासूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची मालिका विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा तसेच वर्धा या सहा जिल्ह्यांत सुरू झाली होती. 2005 साली या 6 जिल्ह्यांत 445 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने पॅकेजची घोषणा करण्यात आली. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना हाती घेण्याच्या घोषणा केल्या. तथापि, 2006 साली 1,449 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर झाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे 1,075 कोटी रुपयांचे पॅकेज तसेच पंतप्रधानांचे 3,750 कोटी रुपयांचे पॅकेज शासनाने जाहीर केले. या पॅकेजचा निधी 2010 मध्ये संपला. मात्र, शासकीय आकडेवारीवर नजर टाकली, तरी ज्या कालावधीत पॅकेजचा निधी होता व शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जात होता, त्याच कालावधीत सर्वांधिक आत्महत्या झाल्यात. या 5 वर्षांत तब्बल 6 हजार 26 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

यावर्षी अमरावती जिल्ह्यातील 1,981 गावांची आणेवारी 50 पैशाच्या आत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 1,419 पैकी 747 गावांची आणेवारी 50 पैशाच्या आत आहे. त्यामुळे विभागातील या 2 जिल्ह्यांतील एकूण 2,728 गावांत दुष्काळ आहे. या स्थितीतही दुष्काळ निवारणासाठी करावयाच्या कामांना अद्याप वेग आलेला नाही. केवळ उपाययोजना आखण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येत्या काही दिवसांत पावसाचे आगमन झाल्यावर दुष्काळावर उपाययोजना करणार काय, असा प्रश्‍न विचारला जात आहे. गतवर्षी पिकांची स्थिती दयनीय झालेली होती. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदलादेखील मिळालेला नाही. कापूस, सोयाबीन सोबतच आता हळद, कांदा पिकालादेखील भाव मिळत नसल्याची गंभीर स्थिती आहे. विदर्भात सिंचनसोयींचा अभाव हेच पिकांची दयनीय स्थिती होण्यास कारणीभूत असताना या गंभीर विषयाकडे येथील पुढारी लक्ष देण्यास तयार नाहीत.

74 शेतकरी अपात्र
आत्महत्याग्रस्त 6 जिल्ह्यांमध्ये 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तरी त्यातील 74 शेतकरी अपात्र ठरविण्यात आलेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही शासकीय लाभ मिळणार नाही. 48 शेतकरी पात्र ठरलेत. 178 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या
2006 - 1,449
2007 - 1,247
2008 - 1,148
2009 - 1,005
2010 - 1,177
2001 ते 2012 - 8,520 आत्महत्या

(शासकीय आकडेवारी )
जानेवारी ते आजपर्यंतच्या आत्महत्या

यवतमाळ - 69
अमरावती - 68
अकोला - 52
बुलडाणा - 49
वाशीम - 32
वर्धा - 30

2012 तील आत्महत्या
जानेवारी - 65
फेब्रुवारी - 64
मार्च - 75
एप्रिल - 82
मे (आजपर्यंत) - 14
प्रतिक्रिया
On 19/05/2012 08:31 PM vijay said:
किती दिवस असे बसणार...तुमची अशी अवस्था करणाऱ्या शासनाला खरी जागा दाखवावी लागते त्यांची..
On 19/05/2012 12:52 PM सचिन कपिले said:
चांगले बघितले तर दिसते कि सर्वात जास्त आत्महत्या अकोला आणि वाशीम जिल्ह्यात झाल्या आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे दोन्ही जिल्हे इतर जिल्ळ्यांपेक्षा खूपच कमी आहेत आणि तरी आत्महत्यांचे प्रमाण इथे खूप दिसते. येथील खार पान पत्त्याची समस्या खूप मोठी आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: