Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

"घोडा बचाव'साठी नागरिकही झाले स्वार!
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, July 10, 2012 AT 01:00 AM (IST)
Tags: horse,   dombivli,   high court
डोंबिवली - "घोडा बचाव, घोडागाडी हटाव' ही मोहीम प्राणीमित्र संघटनांनी राबविण्यास सुरुवात केली आहे. प्राणीमित्र संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून मुंबई, ठाणे, कल्याण, अलिबाग परिसरात चालणाऱ्या घोडागाड्या बंद कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. "घोडा बचाव' मोहीम व्यापक करण्यासाठी प्लांट ऍन्ड ऍनिमल वेल्फेअर सोसायटीने दाखल केलेल्या ऑनलाईन याचिकेला नागरिकांनी चांगला पाठिंबा दर्शविला आहे. ही सगळी माहिती सरकारला दिली जाणार आहे.

प्लांट ऍण्ड ऍनिमल वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष नीलेश भगणे यांनी सांगितले की, घोड्यांच्या पायाला लोखंडी नाल असते. कॉंक्रिट तसेच डांबरी रस्त्यावरून जाताना घोड्याला त्रास होतो. घोडा घसरून पडल्याने गंभीर दुखापत होते. प्रसंगी घोडागाडी अथवा टांगा उलटून प्रवासी व चालकही जखमी होण्याच्या घटना वारंवार घडतात. प्राणी क्‍लेश कायदा 1960 नुसार घोडागाडीतून केवळ तीनच प्रवासी प्रवास करू शकतात. तसे ते बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात सात ते आठ प्रवाशांची वाहतूक घोडागाडीतून केली जाते. रस्त्यावरून आणि चौपाट्यांवर घोडागाडी चालविण्यास बंदी करावी अशी प्राणीमित्र संघटनांची मागणी आहे. मुंबई पालिकेने 1972 नंतर एकाही घोडागाडीला परवानगी दिलेली नाही. पूर्वी मुंबईत 800 घोड्यागाड्या होत्या. त्याची संख्या आज 130 वर आली आहे. त्यांचेही पुनर्वसन करण्याचे काम प्राणीमित्र संघटनांनी सुरू ठेवले आहे. घोडागाडीचा वापर बंद करण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर 25 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

घोडा बचाव मोहिमेत मुंबई फॉर हॉर्स, अलिबागमधील फेडरेशन ऑफ इंजडिन ऍनिमल प्रोटेक्‍टशन, पेटा आणि प्लांट ऍण्ड ऍनिमल वेल्फेअर सोसायटी या संघटनांची ताकद एकवटली आहे. त्यांच्या घोडा बचाव या मोहिमेत अभिनेता जॉन अब्राहम, कंगना राणावत, प्रियांका चोप्रा, गायिका अनुष्का मनचंदा, मॉडेल पै त्रिवेदी, नायिका किट्टू गिडवाणी यांच्यासह वकील अंबिका हिरानंदानी यांचाही सहभाग आहे. घोडा बचावासाठी काधल केलेल्या याचिकेतून स्वाक्षरी मोहीम हाती घेतली असता आतापर्यंत दोन हजार 25 नागरिकांनी "घोडा बचाव' मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे. स्वाक्षऱ्या मुंबई पालिका आयुक्तांना सादर करण्यात येणार आहेत, असे भणगे यांनी सांगितले. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नीलेश भगणे यांच्याशी (9820161114) संपर्क साधावा, असे आवाहन सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.

टांगेवाल्यांचे सर्वेक्षण
कल्याण शहरातही टांगा आहे. रिक्षाच्या तुलनेत टांगाचालकांना मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. त्यातून खर्च भागविणे कठीण होते. कल्याणमधील टांगाचालक मेटाकुटीला आले असून त्यांनी टांगाऐवजी रिक्षाचालकाचे परमीट देण्याची मागणी केली आहे. कल्याणमध्ये 60 ते 70 टांगाचालक आहेत. पेटा आणि प्लांट ऍण्ड ऍनिमल सोसायटीला प्रत्यक्षात किती टांगेवाले आहेत, याचे सर्वेक्षण करण्याचे काम आरटीओने दिले आहे. सर्वेक्षण पूर्ण होण्यास आणखी एक आठवड्याचा कालावधी लागणार आहे.
प्रतिक्रिया
On 10/07/2012 10:14 AM kalyankar said:
एकदा टांगे संपावर गेले होते तर लगेच रिक्षा माजल्या होत्या. आज पण कल्याणात शेअर रिक्षा सोडल्या तर नुसता हात लावला तरी ४० रुपये सांगतात. १.५ किमी अंतराला ४० रुपये म्हणजे RTO च्या अब्रूचा पंचनामा आहे. धनाढ्य मुंबईत रिक्षा स्वस्त आहे आणि मध्यमवर्गीय कल्याण मध्ये महाग. प्रकाश पेणकर आणि त्यांच्या हितचिंतकांची मात्र चांदी आहे. RTO ने कारवाई केली की लगेच संप. दुसरं येतं काय त्यांना. थोडे दिवस थांबा, विज्ञानाचे नवीन शोध आले की रिक्षा इतिहासजमा.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: