Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

मोटारींना टिन्टेड ग्लास; सहाशे चालकांविरुद्ध गुन्हा

-
Friday, August 10, 2012 AT 02:45 AM (IST)
Tags: vehicle,   tinted glass,   crime,   pimpri,   pune

पिंपरी - गडद रंगाच्या काचा (टिन्टेड ग्लास) असलेल्या सहाशे मोटारचालकांविरुद्ध परिमंडळ तीनमधील वाहतूक पोलिसांनी बुधवारी कारवाई करून साठ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मोटार वाहन कायद्याचा भंग केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आल्याचे सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) राजेंद्र भामरे यांनी गुरुवारी (ता. 9) "सकाळ'ला दिली.

मोटारीच्या पुढील व मागील काचा किमान तीस टक्के, तर बाजूच्या काचा पन्नास टक्के पारदर्शक असणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्याचे उल्लंघन सर्रासपणे होत असल्याचे आढळून आले आहे. काही मोटारचालक प्रकाशच आत येणार नाही व बाहेरून आतील काहीही दिसू शकणार नाही, अशा काचा लावत आहेत. तर काही चालक व मालक गडद काचांऐवजी मूळ काचांवर गडद रंगाचे स्टिकर्स लावतात. अशा वाहनांचा वापर अतिरेकी व गुन्हेगारी कृत्ये करण्याची शक्‍यता अधिक असल्याने त्याविरुद्ध कारवाई सुरू केल्याचे पोलिस उपायुक्त (वाहतूक) विश्‍वास पांढरे यांनी सांगितले. वाहनचालकांनी नियमभंग करणाऱ्या काचा लावू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, चार व पाच ऑगस्ट रोजी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात 478 वाहनांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून वाहतूक पोलिसांनी 51 हजार पाचशे रुपये तडजोड शुल्क वसूल केले होते. त्यानंतर तीनच दिवसांनी पुन्हा केलेल्या कारवाईत केवळ पिंपरी-चिंचवड शहरात सहाशे मोटारींविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यातून पुण्याच्या तुलनेत उद्योगनगरीत मोटारींना काळ्या फिल्म लावण्याचे फॅड अधिक असल्याचे दिसून आल्याचे भामरे यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
On 15/01/2013 12:22 PM RUPESH SARODE said:
uv protection is required,but black or less visible films/stickers shall be removed.
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: